Thursday, March 19, 2020

बाईच बाईपण!

     म्हणतात ना, बाईच बाईपण बाईलाच माहीत. खरच आहे ते! तिच्या व्यथा तिलाच कळणार. आता आपले सण सुरु होतायत,एकापाठोपाठ एक. सगळयांनाच वाटत असतं सारे सण कोणत्याही अडचणीशिवाय पार पडावे. आता ही अडचण नक्की कुठली ??? एक बाईच समजून घेऊ शकते. कुठलाही सण येणार असला की बायका दिनदर्शिका हातात घेऊन तारखा पाहू लागतात. सण आणि त्या तारखा जवळपास असतील तर गोंधळच.
     आता जास्त आढेवेढे न घेता स्पष्ट करते त्या तारखा म्हणजे नक्की कुठल्या, पाळीच्या तारखा. खर आहे ना?? आपल्या घरी नाही तर शेजारीपाजारी, आपल्या नात्यातल्या घरात या गोष्टीचा फार मोठा issue  केला जातो. त्या दिवसात हे नाही करायच, ते नाही करायच, इथे हात नाही लावायचा, तिथे हात नाही लावायचा, अस, तस आणि बरच काही. खरच, या सगळयाची गरज असते का?? असते तर का असते हे कुणाला माहीत आहे का?? अस ना तस प्रत्येकाला हा विषय माहीत आहे. पाळी म्हणजे एक अडचण अशीच मान्यता आहे. पण त्याशिवाय बाईला बाईपण आहे का? त्याशिवाय तिच्या स्तित्वाला कोणी महत्व देत का?
    खर तर ही एक देणगी आहे, जी देवाने फक्त स्त्रीला प्रदान केलीये. जिच्याकडे ही देणगी नाही तिला समाजात असंख्य अडचणींना सामोर जाव लागत. आता समाज बदललाय म्हणा पण तरीही. बर यासाठी स्त्रीचीच निवड का झाली असेल?कारण काहीही असो, मला एवढच वाटत की, कुणीही कधीही एखादया स्त्रीला तिच्या स्त्री असल्याचा व्देष, मत्सर वाटावा अस वागू नये. तुम्हाला वाटत असेल अस कशाला वाटेल, पण काही स्त्रिया ज्या हे वाचताहेत,आणि अशा परिस्थितीला सामोर जाव लागलं असेल त्यांना नक्की पटेल. 
     त्या दिवसात किती त्रास सहन करावा लागतो हे स्त्रीलाच माहित. कितीही त्रास होत असला, आणि होणार असला तरीही सणसुद आला की अडचणी नको. मग काय, घ्या गोळ्या ढकला तारखा पुढे, आणि नंतर होणारा त्रास सहन करा. एवढा अट्टाहास कशासाठी? आपण कितीही प्रयत्न केला तरीही सारच काही आपल्याला मिळेल हे गरजेच नाही. बर जर स्त्री गोळया खाऊन तारखा पुढे ढकलतेय तर त्याचा तिला जो त्रास होतो त्यावर उपाय करायची तयारी मात्र कुणाचीच नाही. कधीतरी विचार करा अशा वेळी त्या स्त्रीला काय वाटत असेल. बर एवढ करूनही जर गोळयांचा असर नाही, तर मग तोंड वर करून बोलून दाखवणारे असतात की सणात मोडता घातला. अशा वेळी एखादया स्त्रीला तिच्या बाई असल्याचा व्देष का वाटणार नाही.
     समाज बदललाय पण काही ठिकाणी मानसिकता तीच आहे. वरवर दाखवायच आम्ही नव्या विचारांचे मनात मात्र जुन्या विचारांची गाठोड़ी तशीच आहेत, गरजेप्रमाणे ती सोडायची आणि हवे ते विचार मांडायचे. जुनी लोकं काय विचार करतात देव जाणे, पण मला वाटत त्या दिवसात स्त्रीला जे निर्बंध घातले जात ते तिला आराम मिळावा यासाठी असतील, पण लोकांनी त्याबाबत गैरसमज करून घेतले असावेत. 
     काही घरात तर खाण्यापिण्याची भांडी, कपड़े सार काही वेगळं. त्या स्त्रिला आत्मसन्मान आहे की नाही तिला अगदी वाळीतच टाकल जात त्या दिवसात. सांगायचा मुद्दा एवढाच की जेव्हा एखादया स्त्रीला अशा प्रसंगाला सामोर जाव लागत तेव्हा तिचा आत्मसन्मान दुखावतो. अशावेळी तिला जी देणगी लाभलीये तिच तिला आभिशाप भासू लागते. अर्थात, तिचं अस्तित्व स्वीकारा, स्त्री असो वा पुरुष, दोघांच्याही मनात एकमेकांविषयी आदर असणं गरजेच आहे. 

वादापेक्षा संवाद बरा!

    प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी गोष्ट असते, जी प्रत्येकजण कोणाशीतरी share करायला घाबरत असतो. घाबरण्यामागच कारण काहीही असू शकत. पण, ज्यावेळी गोष्टी मनातल्या मनात घोळायला लागतात, त्यावेळी त्याचे परिणाम काय होतील हे मात्र कोणीच सांगू शकत नाही. वरवर सारं काही सुरळीत आहे अस वाटत, पण आत खोलवर कुठेतरी एक वेगळीच अशांतता असते, वादळापूर्वीची कदाचित. आणि जेव्हा केव्हा या अशांततेचा उद्रेक होतो, तेव्हा ती कोणाकोणाला गिळंकृत करेल याची कल्पना कोणालाच नसते.
   हे असं, सार कोड्यात का बोलतेय? अस वाटत असेल ना!
कोडं उलगडायला हवं, लवकरात लवकर, जराही उशीर न करता, कारण आत्ता केलेला उशीर पुढे किती महागात पडेल नाही सांगू शकत.
    माणसामाणसात सुसंवाद हवा. "सुसंवाद" जो हरवत चाललाय कुठेतरी. या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकजण कामात busy असतो, पण थोडा वेळ आपल्यासाठी, आपल्यांसाठी हवाच, नाहीतर दुरावा निर्माण होतो, न संपणारा.
    काही घरांत आज मुलांमध्ये आणि पालकांमध्ये सुसंवाद नाही. मुलांना आईबापाचा धाक हवा आणि प्रेमही, कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर गेली तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. सगळेचजण social sites वर आधार शोधत असतात, विशेषतः आजची तरुण पीढी, online खूप मित्रमैत्रिणी पण गरजेच्या वेळी कोणी आहे का? सोबत उभं राहायला. वेगवेगळ्या generation मधले मतभेद, आणि त्यावरून होणारे वाद कोणालाच नवीन नसतील. पण मी म्हणतेय, कशासाठी हे सारं? शांतपणे बोलून आपापली मतं कुणी मांडूच शकत नाही का? समोरच्याने कमीपणा घ्यावा असा अट्टाहास का धरता? कधीतरी स्वतः कमीपणा घेऊन समोरच्याच बोलणं ऐकून घ्या ना. निदान ऐकायला शिका, जर कुणाचं काही ऐकणारच नाही, तर समजून कस घेणार!
समोरचा जर त्याच मत मांडत नाही तर तो घाबरतोय किंवा त्याला स्वतःच अस काही मतच नाही अस नाही. कदाचित तुमचं मत समोरच्याला महत्वाचं वाटत असेल. आणि जरी समोरचा घाबरत असेल, तर त्याने तुम्हाला घाबरायचं कारण काय, असाही विचार करा. एखाद्याने घाबरून जगावं, अशी वेळ का येतेय कोणावर? कधीतरी विचार करा.
    गोष्टी जर समोर दिसतायत तर त्यांना नजरंदाज करू नका, हाताबाहेर जाऊ देऊ नका, संवाद करा. पण जे काही बोलाल ते विचार करून बोला आणि बोलल्यावर काय बोललात त्याचाही थोडा विचार करा, कारण वादापेक्षा संवाद बरा.

Saturday, March 14, 2020

'यंदा कर्तव्य आहे'



   मुलीच्या लग्नासाठी स्थळं यायला लागली कि घरात 'यंदा कर्तव्य आहे' च सत्र चालू होत. फारच वेगळा काळ असतो हा, मुलीच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणणारा. प्रत्येकीचं आयुष्य लग्नानंतर सुखी होईल याची खात्री कुणीच देऊ शकत नाही, पण तिच्या आयुष्याची आपल्यामुळे फरपट होऊ नये याची काळजी मात्र प्रत्येकाने घ्यावी.
   मुलीच लग्न ठरवताना तीच मत विचारात घ्या, जर ते मत तुम्हाला पटत नाही तर त्यावर चर्चा करून काहीतरी तोडगा काढा. पण तीच मत पटत नई म्हणून तुमची मत तिच्यावर लादू नका. काही वेळा मुलीच्या काही अपेक्षा असतात शिक्षणाबाबत, नोकरीबाबत, पण ते काही विचारात न घेता लग्न ठरवलं जात. अशा वेळी लग्न म्हणजे फक्त तडजोड हीच भावना मुलीच्या मनात राहते. आई-बाबांच्या भावना दुखावल्या जाऊ नये म्हणून, किंवा इतर काही कारणांमुळे हे असं सारं समाजात घडत असत.
   लग्न ठरायचा या काळात घरात बरेचदा वादविवाद होतात, मतभेद होतात. काही वेळा या साऱ्याला ती मुलगीच जबाबदार आहे असं ठरवलं जात. हे सारं मला समजण्यापलीकडच आहे. सरकारने जरी लग्नासाठी मुला-मुलीच वय निश्चित केलं असलं तरी काही वेळेस, स्थळ चांगल आहे असं म्हणून कमी वयात  मुलीच लग्न लावलं जात, याचा त्या मुलीच्या आयुष्यावर, तिच्या आरोग्यावर काय परिणाम होईल याचा विचार केला जात नाही.
   एखाद्या मुलीच लग्न ठरत नसेल तर, किंवा तिला हवा तसा जोडीदार मिळत नसेल तर तीच भेटेल त्याच्याशी लग्न लावायची तयारी असते काही घरात. का तर, मुलीच वय वाढलं तर तीच लग्न कस ठरेल, समाज काय म्हणेल, आपण अजून किती दिवस तिची जबाबदारी घायची, या अशा विचारांमुळे.
मुलीच शिक्षण जर जास्त असेल  आणि ती आपल्या शिक्षणानुसार मुलाची निवड करू इच्छिते तर त्यात गैर काय आहे? पुरुषी अहंकार सगळ्यांनाच  माहितेय, सगळेच पुरुष स्त्री ला समजून घेतील असं नाही. आजही अनेक घरात स्त्रीच्या मताला काडीचाही मान नसतो. शिक्षण हे लग्नानंतर होणाऱ्या वादाला कारण ठरू शकत.
म्हणूनच सांगतेय, जर मुलीच लग्न ठरवताय तर तीच मत, तिच्या इच्छा-अपेक्षा, तीच शिक्षण सारंच काही लक्षात ठेवून पुढचे निर्णय घ्या. कारण याच निर्णयावर दोन उभयतांच भविष्य अवलंबून असत. फक्त आई-वडिलांनीच मुलीचा विचार करावा अस नाही, मुलीनेही त्यांच्या मताचा, त्यांच्या अनुभवाचा विचार करावा.

Friday, March 13, 2020

'स्त्री'

    'स्त्री' काय अस्तित्व आहे या शब्दाच आजच्या जगात? सांगू शकेल का कोणी?
    आई ,बहिण, पत्नी आणि सखी बरीच रूपे आहेत तिची. प्रत्येक नात्यानुसार तिची कर्तव्ये, तिची भूमिका बदलते. त्यातील आई हे अगदी श्रेष्ठ रूप आहे. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. अस म्हणतात ते काही उगाच नाही बर का! जर आई नसती तर या जगात तुम्ही आम्ही नसतो. नऊ महीने आपला भार तिनेच सांभाळलेला असतो आणि अनेक यातना सहन करून या जगात आपल्याला अस्तित्व मिळवून देते. पण हे सगळ कशाकरता? यामागे तिचा काही स्वार्थ होता का ?
     मला नाही वाटत अस की आपल्याला जन्म देण्यामागे आपल्या आईचा काही स्वार्थ असेल. असं म्हणतात देवाला त्याच्या प्रत्येक लेकराकडे एकाच वेळी लक्ष देण शक्य नव्हत म्हणून त्याने या भूमीवर आई पाठवली.यावरून हे मात्र स्पष्ट होते की आई ही देवास्वरूपच आहे.
     आई बरोबरच स्त्रीची ईतरही रूपे तितकीच महत्वाची आहेत. पत्नी स्त्रीच एक आधाराच नात असत. पतीसाठी जीवनातील सुख दुःख वाटून घेणारी अर्धांगीनी. प्रत्येक अडचणीत पतिबरोबर खंबीरपणे उभी राहणारी, पत्नीच असते.
     बहीण प्रत्येकाच्या नात्यातील एक अस नात ज्याच असित्व प्रत्येकासाठी वेगळं असू शकत. बहीण ही आईसमान काळजी करणारी किंवा एखादया मैत्रिणीसारखी मनमोकळेपणाने वागणारी असू शकते. अडचणीत आपल्याला धैर्य देणारी, आपल्या चुकीवर पांघरूण घालणारी किंवा आपल्याला आपली चूक दाखवून देणारी दुसरी कोणी नसते बहीणच असते.
     आणखी एक स्त्रीरूप आहे सखी, एक महत्वाच रूप. मुली आपल्या गोष्टी मैत्रिणीसोबत मनमोकळेपणाने बोलतातच पण मुलांच्या आयुष्यातही मैत्रिण फार महत्त्वाची भूमिका बजावते. पण आजच्या जगात हे काय चाललंय !तरुणपीढीच्या आयुष्यातील एक महत्त्वाच नात ते म्हणजे मैत्रीच नात. हे नात समजून घ्यायला तरूणवर्ग का चुकतो हेच कळत नाही. बरेचदा या नात्याला प्रेमाच नात समजून एकतर्फी प्रेमाच्या घटना घडतात. मग काय समोरच्याकडून आपलं प्रेम मान्य करवून घेणं हाच ध्यास मनात असतो आणि जर नकार आला तर तुम्हाला माहीतच असाव काय होत.
     असो आतापर्यंत स्त्रीची इतकी रूपं पाहीली, प्रत्येक रूपाचा मानाने उल्लेख केला जातो, पण खरच प्रत्येकाच्या मनात स्त्री साठी तेवढाच मान आहे का??
     स्वतःच्या मनाला नक्की विचारा.

Sunday, August 4, 2019

मैत्री


"मैत्री"





'मैत्री' म्हणजे काय??
पहिली ओळख एका अनोळखीची,
मग बनते सोबत हक्काची,
एक साद मिळते आपुलकीची,
आणि जाणिव होते अटुट विश्वासाची,
जी साथ देते कायमची.
     'मैत्री' किनारा नसलेला, अनंत हिरे माणकांची चमक असलेला, अंत नसलेल्या सौंदर्याचा एक महासागरच आहे. पाहायला गेल तर 'मैत्री' हा एक दोन अक्षरी शब्द आहे, वाचायला फारच सोपा आहे ना!! पण या शब्दाचा अर्थ साांगता येणं फार कठीण आहे. फक्त शाळेत किंवा आपल्या सुखदुःखात सोबत हवी म्हणुन केलि जाते ती 'मैत्री' असते का? गरजेपुरती वापरता येते ती 'मैत्री' असते का? अडचणीच्या संकटाच्या वेळी साथ व्हावी म्हणुन केलि जाते ती 'मैत्री' असते का?
     खर तर 'मैत्री' हे एक अस नातं आहे जे रक्ताच्या नात्याप्रमाणेच किंवा काही वेळा त्यापेक्षाही फार मोलाचं आहे. 'मैत्री' म्हणजे काय हे कदाचित मलाही पुर्णत: माहित नसावं. पण माझ्यामते तरी हे एक अस जिव्हाळ्याच नातं आहे ज्याला कुठेही अंत नाही. जन्माला आल्यापासुन अगदी मरेपर्यंत कुणीही, कुणाशीही 'मैत्री' करावी. मग ती कितीही जणांबरोबर असू शकते. 'मैत्री'  करायला जगातल्या कुठल्याही पोथीपुरणात किंवा कुठल्याही कायद्यात मर्यादा नाही दिलेली. अर्थात् असंख्य माणसांबरोबर आपण 'मैत्री' करू शकतो.
     'मैत्री' ही मधाच्या मधुरतेपेक्षाही फार मधुर असते जी वर्षानुवर्षे टिकून राहते, हिरमाणकांपेक्षाही अधिक चमकदार असते जी आजन्म चमकत राहते, प्राणापेक्षाही प्यारी असते जिच्यासमोर आपल्या प्राणाची किंमतच शुन्य असते. 'मैत्री' हा एक मोती आहे जो हृदयाच्या शिंपल्यात जन्म घेतो आणि आपल्या जीवनाचे सौंदर्य वाढवतो. 'मैत्री'  ही शाहळ्याप्रमाणे दिसायला कठीण, मात्र आतमधे मधुरस दडलेला असतो जो चाखल्यावर त्याची गोडी कळते.
"friendship is a gift you give yourself"
     'मैत्री' जीवनाला एक नव वळण देते, आपल्या जीवनात स्वतःच एक नव विश्व तयार करते.
"A new friendship is like,
an unripened fruit, it may 
become either an orange or a lemon."
  ही गोष्ट सत्यच आहे की नवी  'मैत्री'  फार नाजुक असते, तिची योग्य ती जपणुक नाही केली तर ती आपल्या आयुष्यात कायमची कटुता निर्माण करू शकते.
आपल्या 'मैत्री'तला महत्वपुर्ण भाग म्हणजे,
"Friend is that person who behaves as a father, mother, sister, brother when necessary"
  आपल्या सुखात आपली साथ पुरावणारा आणि दुःखात पल्यासोबत खंबीरपणे उभं राहून मार्ग काढणारा आपला मित्रपरिवारच तर असतो.
"Your friend is the man who knows all about you and still likes you"
  आपला मित्रपरिवार हा 'मैत्री'चा एक मौल्यवान भाग असतो की ज्याच्याशिवाय 'मैत्री'च काही अस्तित्वच नाही.
  संकटाच्या वादळात मदतीचा हात पुढे करणारा, चुकांच्या महापुरात समजुतीच्या नावेत आपल्याला स्वार करुन सुखरूप स्थळी पोहचवणारा, नैराश्याच्या भूकंपात धीर देणारा, असफलतेच्या अंधारात प्रकाशाची ज्योत पेटवणारा, प्रत्येक खडतर परीक्षेत शुभकामनांचा वर्षाव करणारा आपला मित्रपरिवारच असतो. आपल्या आयुष्यातील काही गोष्टी आपण आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर वाटून घेतो.
     सोबत नसतानाही असल्याची फ़क्त जाणीवाही आपल्या 'मैत्री'ला घट्ट बनवते. आपल्याला पुर्णपणे बदलण्याची, योग्य वाटचालीवर चालवण्याची क्षमता असते 'मैत्री'त.
विश्वास हे एक अस शस्त्र आहे जे 'मैत्री'तील कितीही मोठा अडथळा दूर करू शकते. परंतु हेच दुधारी शस्त्र एका अटूट 'मैत्री'ला नष्ट करू शकते.
"In true friendship,
trust is a powerful thing,
that must not be broken by any friend."
जेव्हा 'मैत्री'त विश्वासाला ईजा पोहोचते तेव्हा त्या 'मैत्री'च काही अस्तित्वच उरत नाही. एकदा तुटलेला विश्वास 'मैत्री'सारख्या एक मजबुत नात्याला कायमच तोडू शकतो. त्यामुळे 'मैत्री'त कधीही एकमेकांचा विश्वास तोडू नये.
     'मैत्री' ही ईश्वराने आपणा सर्वाना दिलेली एक देणगी आहे जी आपण आपल्या आयुष्यात निस्वार्थी भावनेने जपली पाहिजे."

बाईच बाईपण!

     म्हणतात ना, बाईच बाईपण बाईलाच माहीत. खरच आहे ते! तिच्या व्यथा तिलाच कळणार. आता आपले सण सुरु होतायत,एकापाठोपाठ एक. सगळयांनाच वाटत असतं ...